Pune : शहरातील तापमानाचा पारा घसरला

पुणे : शहरात आज दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. त्यामुळे मागील आठवड्यापासून तापलेल्या पुण्यात आज उन्हाचा चटका काहीसा कमी प्रमाणात जाणवत होता. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे ४२ अंशांवरील कमाल तापमान आज ३९ अंशांपर्यंत खाली आले होते.
मागील काही दिवसांत वाढलेल्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करत होता. कमाल तापमानाने ४२ अंशापर्यंत मजल मारली. त्यामुळे कोरेगाव पार्क, मगरपट्टा, हडपसर, शिवाजीनगर, एनडीए, वडगावशेरी या भागात उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. मात्र, राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.
परिणामी पुणे शहर आणि जिल्ह्यातही दोन दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण होत असल्याने उन्हाचा चटका कमी झाला होता. आज शिरूर येथे सर्वाधिक ३९.३, मगरपट्टा परिसरात ३७.८, कोरेगाव पार्क ३७.२, हडपसर ३६.७, शिवाजीनगर ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





