Pune : पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार

पुणे : शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी (दि. १२) चाळीशीपार गेला. हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरूनगर येथे ४०.७ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली असून, आज दिवसभर उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता.
कोरेगांव पार्क, शिरूर आणि तळेगाव ढमढेरे येथील कमाल तापमान ४० च्या पुढे नोंदविले गेले. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानाने ४१ अंशापर्यंत मजल मारली असून, आज दिवसभर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत होती. मागील आठवड्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली.
शिवाजीनगर, पुरंदर, बालेवाडी, तळेगांव, चिंचवड, हडपसर, मगरपट्टा आणि पाषाण परिसरातील कमाल तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले.दुपारी दोननंतर उन्हाचा चटका वाढल्यामुळे रस्त्यावरची वर्दळ कमी झाली. लक्ष्मी रस्त्यासह जंगली महाराज रस्ता, बाजीराव रोड, कर्वे रोड या प्रमुख रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ कमी होती. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे, आकाश निरभ्र राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
राजगुरूनगर ४०.७, शिरूर ४०.६, ढमढेरे ४०.३, कोरेगांव पार्क ४०.२, पुरंदर ३९.९, बालेवाडी ३९.८, तळेगांवा ३९.४, चिंचवड ३९.१, गिरीवन ३९, हडपसर ३८.९, मगरपट्टा ३८.३, शिवाजीनगर आणि पाषाण ३८.२, आंबेगाव ३७.९, एनडीए ३७.५, इंदापुर ३६.९, भोर ३६.७, बारामती ३६.३, हवेली ३६.१




