Pune : अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा

पुणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच खेळत खेळत शिक्षण या तत्त्वाला प्राधान्य देण्यात आले आहे. चिमुकल्यांना शाळेची गोडी लागून ती कायम राहावी, यासाठी विद्यार्थ्यांना अक्षर, अंक, रंग, आकार ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे याचे शिक्षण आता सेविका देणार आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकाच चिमुकल्यांच्या शिक्षिका होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा दिला जाणार असून, अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे. त्यानुसार प्राथमिक शाळांतील पहिलीच्या शिक्षकांनास तसेच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील ५५३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तब्बल १ लाख १० हजार ५५६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये सव्वा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आहेत. यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण सेविकांना प्राथमिक टप्प्यात सहा महिन्यांचे आणि दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे सेविकांना ३ ते ६ वर्षे वयोगटांतील बालकांना कसे शिकवायचे, त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी कोणत्या उपक्रमांचा वापर करायचा, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
आता अंगणवाडी सेविकांची भूमिका केवळ देखरेख करणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही, तर त्या प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षिकेप्रमाणे काम करणार आहेत. सर्व अंगणवाडी सेविकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत एकूण ८ कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असूनस आतापर्यंत २ कार्यशाळा पार पडल्या आहेत. या अभ्यासक्रमात शिक्षणाचे तंत्र, अध्यापन कौशल्ये, खेळावर आधारित शिकवण्याच्या पद्धती यांचा समावेश असणार आहे.





