Pune : रखरखत्या उन्हात वाहन बाहेर काढताय…

पुणे : उन्हाळा सुरू होताच चारचाकी वाहनांसह बस, ट्रक, टेम्पो यांसह अन्य गाड्यांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर मागील महिन्याभरात तीन ते चार चालत्या वाहनांना आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे रस्त्यावर वाहन आणण्यापूर्वी वाहनांची तपासणी करावी. बॅटरी, वायरिंग, इंधन गळत नाही ना? टायरमध्ये पुरेशी हवा आहे का, याची तपासणी करूनच वाहन बाहेर काढावे. जेणेकरून पुढील धोका टळेल.
दोन दिवसांपूर्वी पुणे-सातारा मार्गावर एका धावत्या टेम्पो ट्रॅव्हलला लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याअधी स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमधून अचानक धूर येऊ लागला. तर पीएमपी बसला आग लागल्याच्या दोन ते तीनवेळा घटना उघडकीस आल्या. चारचाकी वाहनांनीसुद्धा पेट घेतल्याची घटना समोर आली. या बहुतांश घटना इंजिनमध्ये बिघाड (शाॅर्ट सर्किट, इंधन गळती, इंजिन जास्त गरम होणे, ऑईल कमी असणे, बॅटरी गरम होणे) असल्या कारणांमुळे घडत असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जातो.
सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या सुरू झाल्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त पुण्यात राहणारे कुटुंब गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसह खासगी ट्रॅव्हल्स किंवा स्वत:च्या वाहनांनी प्रवास करीत आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यापासून एसटी, बस, ट्रॅव्हल्सला प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. मात्र, ही सर्व वाहने रस्त्यावर आणण्याआधी सुरक्षित आहेत ना? याची खात्री करावी, असे आवाहन पुणे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
एसटीकडून प्रत्येक बस तपासणी करूनच मार्गावर सोडण्यात यावी, अशा सूचना दिल्या. मात्र, खासगी ट्रॅव्हल्ससह अन्य वाहनांचे काय? खासगी ट्रॅव्हल्सकडून अनेकवेळा अंतर्गत बदल केले जातात. त्यामुळे घटना घडल्यावर ती जीवघेणी ठरू शकते. पुण्यातून दररोज एक हजारपेक्षा जास्त खासगी बस धावतात. त्यामुळे बसमध्ये प्रवाशी बसल्यानंतर त्याला आपत्कालीन दरवाजाची माहिती मिळणे आवश्यक आहे. बस चालविताना चालकाने मोबाईलवर बोलू नये, मद्यपान करू नये, वेग मर्यादा नियमांचे पालन करावे, बसची वेळेवर देखभाल दुरुस्ती करावी. फिटनेस सर्टीफिकेट असावे, आपत्कालीन दरवाजाजवळ अडथळा निर्माण करू नये. अग्निशमन यंत्रणा अद्यावत ठेवावी, अशा सूचना आरटीओकडून खासगी बस चालकांना दिल्या जात आहेत. पण, या सूचनांचे किती गांभीर्याने पालन होते हा प्रश्न आहे.
बसचालकांनी वाहतूक नियमांच्या अटी आणि नियमांचे पालन करावे. गाडीचे फिटनेस, परमिट, इशुरन्स ही कागदपत्रे पूर्ण पाहिजे. तसेच गाडी निघताना आपत्कालीन दरवाजा व्यवस्थित आहेत का? हे पाहावे. बसचालकांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– सुजित डोंगरजाळ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
वाहन पेट घेण्याची कारणे…
जास्त तापमानात शॉर्टसर्किट होऊन आग लागू शकते. बॅटरी गरम होणे, इंधन गळती, विद्युत प्रणालीतील त्रुटी, खराब वायरिंग यामुळे आग लागण्याची शक्यता असते.
वाहनांची नियमित देखभाल न केल्यास, वाहनातील अंतर्गत बदल…कचरा आणि ज्वलनशील पदार्थ यामुळे आगीच्या घटना घडतात. त्यामुळे वाहन नियमितपणे तपासणे, बॅटरीची काळजी घेणे, इंधन गळती टाळणे, अयोग्य वस्तू ठेवू नये, वाहन नियमितपणे सर्व्हिस करणे महत्त्वाचे आहे.





