Pune : पाण्याचा अपव्यय थेट कारवाई करा

पुणे : वाढत्या उन्हाळयामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी, शहरातील पाण्याची मागणीही वाढलेली असल्याने शहरातील नागरिकांना पाणी पुरविताना महापालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र, अशा स्थितीतही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे. या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या आढावा बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील पाण्याचे नियोजन, तक्रारी तसेच इतर कामांबाबत प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेण्यात येते.
तर दंडात्मक कारवाई करा…
शहरात अनेक ठिकाणी सोसायट्यांंना स्वयंचलित पाण्याचे काॅक नाहीत, त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो होते. याशिवाय, अनेक बैठ्या घरांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी बाग, वाहने धुणे, रस्त्यावर मारणे अशा कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. तर काही ठिकाणी वाॅशिंग सेंटरमध्ये पिण्याचे पाणी गाड्या धुवण्यासाठी वापरले जात असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर पाण्याचा हा अपव्यय रोखण्यासाठीच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्यांचा हा प्रकार आढळल्यास नोटीस द्यावी, त्यानंतर दंडात्मक करवाई करावी तसेच त्यानंतरही पाणी वाया जात असल्यास थेट नळजोड तोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.
तक्रारींची शहानिशा करणार
शहरात पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: ज्या सोसायटयांंच्या इमारती जुन्या आहेत त्या ठिकाणी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता अशा सोसायट्यांच्या ठिकाणी अभियंत्यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सोसायटीला मीटरद्वारे किती पाणी दिले जाते हे तपासून सोसायटीच्या वितरण व्यवस्थेत गळती असल्यास त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठीच्या नोटीस देण्यात येणार आहेत.




