पुण्याचा आधार गेला ! सुसंस्कृत नेता, मार्गदर्शक नेतृत्व खासदार गिरीश बापट यांना शब्दश्रद्धांजली

पुणे -सर्वसमावेशक नेतृत्व आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी खासदार गिरीश बापट यांची ख्याती होती. बुधवारी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सारेच सुन्न झाले. राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणून बापट हे सर्वांना परिचित होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना…
पुण्याचा आवाज अशी गिरीश बापट यांची ओळख होती. पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. असा नेता, असा खासदार पुन्हा होणे नाही.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने “पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती.
– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे
सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
गिरीश बापट आणि आम्ही शाळेपासून एकत्र होतो. 58 वर्षांची ही साथ संपली. मनपा स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, खासदार म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले. आणीबाणीच्या लढाईपासून सरकारच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या.
– प्रकाश जावडेकर, खासदार
कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व पक्षांतील लोकांशी मैत्री जपणारा दिलदार माणूस असे गिरीश बापट यांचे व्यक्तिमत्त्व होते.
– वंदना चव्हाण, खासदार, राज्यसभा
खासदार गिरीश बापट यांचे निधन दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून निवडून गेले. राज्य मंत्रिमंडळातही ते होते. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
– सुप्रिया सुळे, खासदार
खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केले. मला मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे नेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमावला आहे.
– सुनील टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस
गिरीश बापट यांचा यांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी काम केले. मागील आठवड्यात त्यांच्या खासदार निधीतून कसबा गणपती मंदिरात भित्तीचित्र अनावरणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलविले. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे त्यांनी शिकविले.
– रवींद्र धंगेकर, आमदार, कसबा विधानसभा
खासदार गिरीश बापट यांचे पक्षाच्या उभारणीतील त्यांचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अफाट जनसंपर्क, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेली कटिबद्धता यामुळे त्यांनी पुण्याच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या बापट यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च महत्त्व दिले.
– चंद्रशेखर बावनकुळे, भाजप, प्रदेशाध्यक्ष
खासदार गिरीश बापट यांच्या जाण्यानं अतीव दुःख आमच्या वाट्याला आलंय. पुण्याच्या विकासात योगदान देतानाच राजकीय संस्कृतीचा वस्तुपाठही भाऊंनी घालून दिला, जो सर्वच राजकीय पक्षात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, पुणे
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका, विधानसभा व लोकसभेत काम करताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषवताना त्यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बापट कुटुंबीय आणि आम्हा भाजप परिवारातील सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो.
– मेधा कुलकर्णी, माजी आमदार, कोथरूड
गिरीश बापट यांचा संस्कृत भारती संघटनेशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी संस्कृत भाषेबद्दलचे आपले प्रेम अनेकदा व्यक्त केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी संस्कृतमधून शपथ घेतली. संस्कृत भारती तसेच अन्य संस्कृतप्रेमी संस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांत ते भाग घेत.
– कर्नल सतीश परांजपे,
पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष, संस्कृत भारती
गिरीश बापट यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर स्वरूपाचे होते. संघाचे पथसंचलन आणि घोषात त्यांना पाहणे हा आनंदाचा भाग होता. मिश्किल स्वभाव असल्यामुळे ते सर्वांचे नैराश्य दूर करायचे. लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभा मतदारसंघ कसा जोपासावा, सर्व जाती-धर्मांना कसे सांभाळावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.
– प्रा. अनिरुद्ध देशपांडे,
अखिल भारतीय सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
लोकांमधून पुढे आलेले नेतृत्व खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे शहर पोरकं झालं आहे. विकासाच्या पातळीवर पुणे शहराची अपरिमित हानी झाली आहे.
– प्रमोद (नाना) भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना, पुणे




