Pune: निवडणुकीच्या जादा गाड्यांना उन्हाळी सुट्टीची गर्दी

पुणे – लोकसभा निवडणुकीमुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यातच उन्हाळी सुट्टयांमुळे अधीच रेल्वेचे बुकिंग फुल्ल असून, स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतीय प्रवाशांची संख्या यामध्ये अधिक आहे. जादा गाड्या सोडूनही त्या अपुऱ्या पडत असून रेल्वे प्रशासनावर त्याचा अधिक ताण येत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या रेल्वेच्या तिजोरीत भर टाकणारी ठरणार आहे.
पुणे शहरात नोकरी, शिक्षणानिमित्त उत्तर भारतातून अनेक तरूण-तरूणी, नागरिक आलेले आहेत. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टयांमध्ये हे उत्तर भारतीय मोठ्या संख्येने गावी जातात. त्यातच लोकसभा निवडणूक असल्यामुळे मतदानासाठी जाणाऱ्यांची गर्दीही अधिक आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या गर्दीच्या हंगामात विशेष गाड्यांचा २४६ फेर्यांचे नियोजन आहे.
तसेच वाढत्या गर्दीमुळे जादा फेर्या वाढविण्यात आलेल्या असल्या तरी या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्यास जागा नसल्याची स्थिती आहे. ज्या गाडीमध्ये १५०० ते १६०० प्रवाशांची क्षमता आहे, त्यामध्ये किमान अडीच ते तीन हजार प्रवासी जात आहेत. या गर्दीमुळे रेल्वेच्या महसुलामध्ये मात्र वाढ होत आहे.
राजकीय पक्षांकडून तिकीट बुकिंग…
लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मतदरांना खुश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्थलांतरित कामगारांना एकत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे तिकिट विक्रीची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या गर्दीमुळे काही वेळी तिकीट विक्री बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत आहे. तसेच काही प्रवाशांना तिकिट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करणार्यांची संख्या वाढत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना…
– चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचारी
– रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणाची व्यवस्था
– रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट तपासणी
– क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री
– वरिष्ठांकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
“उन्हाळी सुट्टी आणि निवडणुकीमुळे यंदा प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विनातिकिट प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी तिकीट तपासणीसांची संख्याही वाढविण्यात आली आहे.” – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक





