Pune: लिंबांच्या दराला उन्हाळी चटका

पुणे : उन्हाळ्याप्रमाणे ऊन असल्याने सरबत आणि रसवंतीगृह गजबजू लागली आहेत. गृहिणींकडूनही लिंबांची खरेदी वाढली आहे. आवकच्या तुलनेत लिंबांना मागणी वाढल्याने आठवडाभरात लिंबाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही चढ्या भावाने लिंबाची विक्री होत आहे. दर्जानुसार लिंबाच्या नगाची विक्री ३ ते ७ रुपये भावाने होत आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ८०० ते १००० गोणी लिंबांची आवक होत आहे. एका गोणीमध्ये आकारानुसार ४५० ते ५५० नग असतात. गेल्या आठवड्यात एका गोणीला ४०० ते ७०० रुपये असलेला भाव या आठवड्यात गोणीला दर्जानुसार ५०० ते ११०० रुपयांवर गेला असल्याचे मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून बाजारात लिंबाची आवक होत आहे. शहरासह जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांकडून लिंबाची खरेदी करण्यात येत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात लिंबाला उच्चांकी भाव मिळाला होता. त्यावेळी हैदराबाद आणि तामिळनाडू येथून येथील बाजारात लिंबाची आवक झाली होती.
उन्हाळ्यात उन्हाचा चटका वाढू लागल्यानंतर लिंबाला मागणी वाढत असते. यंदा तापमान वाढल्याने मागणी आतापासूनच वाढली आहे. येत्या काळात मागणी आणि भाव दोन्हीत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
– रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड





