Pune Suicide Case – नांदेड सिटीत एका तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पार्थ बापू गोरे (वय २१, रा. आसावरी इमारत, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे यांनी नांदेड सिटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ नांदेड सिटीत मामांकडे राहात होता. नांदेड सिटीतील आसावरी इमारतीतील एका सदनिकेत तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मंगळवारी (१० मार्च) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्थने कानाच्या मागे पिस्तूल लावून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पार्थने आत्महत्या का केली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी सुरू असून, पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. हे पिस्तूल त्याने कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.