Pune: रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्जचा अहवाल सादर करा

पुणे – महापालिकेची नियमावली डावलून रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या हद्दीत मोठे होर्डिंग्ज ( जाहिरात फलक) उभारलेले आहेत. त्याचे कोणतेही स्ट्रक्चरल आॅडिट होत नाही. तसेच हे सर्व जाहिरात फलक मुख्य रस्ते आणि सिग्नललगत आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच उभारलेल्या या जाहिरात फलकांबाबत अहवाल सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आकाशचिन्ह आणि परवाना विभागास दिले आहेत.
या जाहिरात फलकांबाबत माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच हे जाहिरात फलक उभारताना नियमांचे उल्लंघन झाले आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील जाहिरात फलक कोसळल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार सुरू असल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही बागवे यांनी केली आहे.
बागवे यांनी दिलेल्या पत्रानुसार, शहरात रेल्वे, एसटी, नदीपात्रात जलसंपदा विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक उभारलेले आहेत. तसेच काही इमारतींचे साइड मार्जिन्स, फ्रंट मार्जिन्स, पार्किंग व्यतिरिक्त कोणतेही स्ट्रक्चर उभारण्यास परवानगी नाही. पण, शासकीय नियमांचे कारण देत शहरात अनेक भागात भले मोठे जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत.
शाहीर अमर शेख चौकातील घटनेनंतर पुन्हा त्या चौकासह आरटीओ चौक आणि मुख्य रस्त्यावरच ४० फुटांपेक्षा अधिक मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. काही फलकांची लांबी १२० फुटांपेक्षा अधिक आहे. तसेच हे स्ट्रक्चर्स मातीच्या ढिगारऱ्यावर उभारलेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी अपघाताचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी बागवे यांनी केली आहे.




