Abhijeet Deepke : ‘मला अटक करा’, मेट्रो-रेल्वे बंद करण्यावर अभिजीत दीपकेंचा संताप; म्हणाले, ‘आंदोलन….’
Abhijeet Deepke : CJPच्या १० ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनाला परवानगी नाही. अभिजीत दीपके यांनी मेट्रो-रेल्वे निर्बंधांवर सरकारवर टीका करत ‘आंदोलन होणारच’ अशी भूमिका घेतली.

Abhijeet Deepke : दिल्लीतील जंतर-मंतर येथे १० ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या प्रस्तावित आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र, परवानगी मिळाली नसली तरी आंदोलन होणारच, अशी भूमिका CJPचे कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आले तरी त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे आणि मेट्रो सेवांवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार तरुणांना घाबरत असल्याचा आरोप करत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने ‘अधिकृतपणे आणीबाणी लागू केली आहे’, असा दावा केला.
“तुम्ही एवढे का घाबरत आहात? तुम्हाला देशातील तरुणांची भीती वाटते का? रेल्वे आणि मेट्रो बंद करत असाल तर सामान्य माणसाने काय करायचे?” असा सवाल दीपके यांनी केला.
सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरील निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांनाही त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले. “दिल्ली नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांची मालमत्ता आहे का? आंदोलनामुळे लोकांना त्रास होतो असे म्हणता आणि दुसरीकडे मेट्रो, रेल्वे आणि रस्ते बंद करता. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
‘मला अटक करा’, दीपकेंचे आव्हान
CJPचे कार्यकर्ते आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले किंवा अटक केली तरी तयार असल्याचे दीपके यांनी सांगितले. “किती जणांना ताब्यात घेणार? मला अटक करा, ताब्यात घ्या. सौरव तयार आहे, आशुतोषही तयार आहे,” असे ते म्हणाले.
जंतर-मंतर हे आंदोलनासाठी निश्चित ठिकाण असल्याचा दावा करत त्यांनी पोलिसांच्या परवानगीच्या नियमावरही प्रश्न उपस्थित केला. संविधानातील अनुच्छेद १९ नागरिकांना आंदोलनाचा अधिकार देतो, असे सांगत परवानगी घेण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.
“१३ कोटी मते हटवण्यापूर्वी जनतेची परवानगी घेतली होती का?” असा सवाल करत दीपके यांनी निवडणूक प्रक्रियेवरही आरोप केले. बेंगळुरूमध्ये जिवंत व्यक्तींना मृत दाखवून त्यांची मते कापल्याचा दावाही त्यांनी केला.
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी “देशाचे लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आम्ही आंदोलन करू,” असे म्हटले.
दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. १३ कोटी मते हटवण्यापूर्वी परवानगी घेतली होती का, असा सवाल त्यांनी केला. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील बदलांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला.
दिल्ली पोलिसांची परवानगी नाही –
दरम्यान, जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला होणाऱ्या CJPच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, CJPने आंदोलनाची माहिती उशिरा दिली. जंतर-मंतरवर आंदोलनासाठी किमान १० दिवस आधी परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सीजेपीच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?
CJP हे निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करत आहे. मतदारयादीतील मतांची कथित वजावट, जिवंत व्यक्तींना मृत दाखवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मतदारयादीची पारदर्शक तपासणी, चुकीची नावे पुन्हा समाविष्ट करणे आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता ठेवण्याची CJPची प्रमुख मागणी आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आहे.





