पुणे: ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’द्वारे कासवांच्या जीवनशैलीचा अभ्यास

कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन महिन्यांत 3 कासवांवर प्रयोग
पुणे – भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागात असलेल्या कासवांच्या जीवनशैलीच्या अभ्यासासाठी संशोधकांकडून सॅटेलाइट ट्रान्समीटर हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. गेल्या दोन महिन्यांत कोकणातील तीन कासवांना अशाप्रकारचे ट्रान्समीटर बसविण्यात आले आहेत.
सागरी जैवविविधा संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या मुंबईतील “मॅंग्रोव्ह फाउंडेशन’ आणि “भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विशेष अभ्यास प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकणातील गुहागर, वेळास आणि आंजर्ले किनाऱ्यावर प्रत्येकी एक मादी ऑलिव्ह रिडले कासवाला “सॅटलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले आहे.
“डब्लूआयआय’चे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या कासवाला “ट्रान्समीटर’ लावण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्याला पुन्हा समुद्रात सोडले. यावेळी कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, विभागीय वनाधिकारी आदर्श रेड्डी, राजेंद्र पाटील, डॉ. मानस मांजरेकर, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, संशोधन समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यासकांना या कासवांच्या विणीच्या नेमक्या जागा, नेहमीच्या अधिवासाच्या जागा, खाद्याच्या जागा आणि स्थलांतर मार्गांची माहिती मिळेल.





