Pune : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

पुणे : स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. नियमांचे पालन कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे. स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही; पण नियमही शिथिल होणार नाहीत. नियमाचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
अनधिकृत स्कूल बसवर कारवाई
वाहतूक नियमावलीनुसार सध्या ४० हजार स्कूल बसेस राज्यभर आपली सेवा देत आहेत. मात्र, याव्यतिरिक्त ५० ते ६० हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने- आण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्कूल बस चालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. पुढील ३ महिन्यांमध्ये या अनधिकृत स्कूल बसचालक- मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
स्कूल बस धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. धोरणातील त्रुटी दूर केल्या जातील. आजच्या बैठकीत स्कूल बस आणि पालक असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांचा धोरणातील नियम सुधारणावेळी विचार केला जाईल.
– विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त





