पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूडमाॅलमध्ये जेवण करत होता. मात्र, विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकाने जेवत्या ताटावरुन उठविले. त्याच्या निषेधार्थ भर पावसात जेवण करत एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर रात्री अकरा वाजता आत्मक्लेश आंदोलन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. अक्षय दहिफळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो विधी शाखेत शिक्षण घेत आहेत. रात्री दहा वाजता विद्यार्थ्यांचा समूह विद्यापीठाच्या फूडमाॅलमध्ये जेवण करत होते. त्याचवेळी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक फूडमाॅल आले आणि विद्यार्थ्यांना “तत्काळ जेवण संपवा, मला फूडमाॅलचे गेट बंद करायचे,’ असे सांगत सुरक्षारक्षकाने त्यांना जेवण करताना हटकले. दुसरीकडे विद्यार्थी “आमचे जेवण सुरू आहे. आम्ही लवकरच जेवण संपवू, थोडा वेळ थांबा,’ अशी विनंती करत होते. मात्र, सुरक्षारक्षकाने काहीच एकण्याच्या तयारीत नव्हते. त्यात विद्यार्थी व सुरक्षारक्षकामध्ये वादावादी झाली. या सर्व प्रकाराने संतप्त होत दहिफळे या विद्यार्थ्याने आहे, तसे ताट घेऊन मुख्य इमारतीच्या समोर असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर येथे ठिय्या मांडला. विद्यापीठाच्या या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्याने जेवण करत पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. अखेर रात्री दोन वाजता विद्यार्थ्याचे समजूत काढल्याने हे आंदोलन मागे घेतले.