पुणे; अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवा; ‘नगररोड कट्ट्या’ची मागणी

विश्रांतवाडी : पुणे शहरात दोन वर्षापासून करोनाची तीव्रता अधिक होती. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवावे लागल्याने सर्व व्यवसायिक हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली अतिक्रमण कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी नगररोड कट्ट्याच्यावतीने करण्यात आली आहे. कट्ट्याच्या सभासदांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करीत याबाबतचे निवेदन दिले आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, राहुल भंडारे, रमेश आढाव, राजेंद्र खांदवे, नितीन भुजबळ, मोहनराव शिंदे, पांडुरंग देवकर यांनी सविस्तर चर्चा केली. सध्या, शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. धानोरी येथे कारवाईला गालबोट लागले, अशी घटना घडायला नको होती .
कारवाई केलेले बहुतेक दुकानदार व्यवसायिक हे पालिकेचे करदाते आहेत. लाखो रुपयांचा कर त्यांच्या माध्यमातून पालिकेला मिळत आहे. यात ज्यांनी फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमध्ये अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, सरसकट प्रत्येक दुकानावर नोटीस न देता कारवाई करणे कुठल्या न्यायात बसते? कोणताही दुकानदार व्यवसाय करतताना त्या व्यवसायाचा नामफलक दुकानाबाहेर लावला जातो. तो. त्यासाठी 3 फूट उंचीपर्यंत असलेल्या फलकासाठी परवानगी घ्यायची गरज नाही, हा शासन निर्णय असल्याने होणारी कारवाई चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील इतर प्रश्न सुटले आहेत का ?
महिलांसाठी स्वच्छतागृहे, अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करणे, नालेसफाईतील भ्रष्टाचार थांबवणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न, रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करणे जसे कि खराडी शिवणे रस्त्याचे भू-संपादन, मैलापाणी शुद्धीकरण, नदीसुधार प्रकल्प इत्यादी विविध प्रश्नांना हात घालून त्यावर आपल्याकडून कामे होणे अपेक्षित असताना ते होत नाहीये.





