Pune : हातावरचे पोट अन् पोटावरच डंपरचे चाक…

पुणे – हातावरचे पोट असणाऱ्या काही कुटुंबातील सदस्य अमरावतीवरुन चिल्ल्या- पिल्यांसह रविवारी दुपारी वाघोली येथे उतरले होते. तेथे पालावर राहणाऱ्या काही नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रोजगार शोधायचा होता. एक रात्र पदपथावर काढून सकाळी ते रोजगारच्या शोधावर निघणार होते.
मात्र, एका अपघाताने त्यांच्या कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. हातावरचे पोट भरले नाहीच; मात्र पोटावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचे रोजगाराचे स्वप्न मात्र भंग पावले. रविवारी रात्री घडलेल्या अपघातात एकाच गावातील आणि नात्यातील २२ जणांपैकी तिघांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त झालीच, मात्र ते वाचले त्यांना मात्र मोठा मानसिक धक्का बसला आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर तालुक्यातील मंगळूर-चव्हाळा गावातील वैराळ, भोसले आणि पवार कुटुंबातील २२ सदस्य वाघोली येथे उतरले होते. ते मागील चार वर्षे गावाकडील सोयाबीनची काढणी संपल्यावर रोजगाराच्या शोधार्थ वाघोली येथे येतात. यावेळी ही ते पेरणी काढल्यावर रोजगाराच्या शोधार्थ आले होते. चौकातील मोकळ्या जागेत पालामध्ये त्यांचे काही नातेवाईक राहतात.
दुपारी उतरल्यानंतर रोजगाराची चाचपणी करुन ते रात्री पदपथावरच जागा मिळेल तसे झोपले. यातील मृत आणि जखमी तेथील वडापावच्या गाड्यालगत असलेल्या सिमेंटने सारवलेल्या जागेवर झोपले. रात्री झोपेत असतानाच भरधाव डंपर त्यांना चिरडत गेला. दोघा चिमुकल्यांना तर श्वास घेण्याची उसंतही मिळाली नाही.
अवाढव्य डंपरखाली दोन कोवळे जीव चिरडले गेले. जखमींच्या कोलाहालाने पालात झोपलेल्या पाचपन्रास जणांनी पदपथाकडे धाव घेतली. सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. पलिकडेच असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारीही धावत आले. त्यांनी गांभीर्य ओळखत जखमींना रुग्णालयात नेले. तर डंपरमध्येच असलेल्या चालकाला ताब्यात घेतले.
जखमींना भाकरीची भ्रांत..
घटनेतून बचावलेले नातेवाईक मोठ्या धक्क्यात आहेत. हाती पैसा नाही, शहरात कोणाची ओळख नाही आणि ज्यांची आहे, तेच पालावर राहून कसाबसा उदरनिर्वाह करत आहेत. यामुळे उपचार मोफत होतील, मात्र जखमींना बरे होण्यास अनेक महिने लागू शकतात. तोवर त्यांच्या उपचारासाठी आणि रोजीरोटीसाठी धावपळ कशी करायचा हा प्रश्न? आ वासून उभा राहिला आहे. यात दोन चिमुकल्यांचे पालक मात्र बचावले. मुले गमावल्याचे दुख त्यांना अनावर झाले होते.
भाऊ गेला, वहिनी गंभीर जखमी
या घटनेत पालावर राहत असलेल्या हिम्मत पवार यांचा भाऊ विशाल पवार (२२) यांचा मृत्यू झाला. त्यांची वहिनीही गंभीर जखमी आहे. हिम्मत म्हणाले, “भाऊ गमावला, वहिनी जखमी आहे. मात्र, माझ्या हातात एक पैसा नाही. मला तिला पाहायला रुग्णालयात जायचे आहे. भावावर अंत्यसंस्कार करायला लागणार आहे. काल एका केटररकडे काम केले. मात्र त्याने माझा ५०० रुपये रोज दिला नाही. त्याने पैसे दिले असते तर थोडीफार हालचाल करू शकलो असतो.’





