पुणे – दृष्टीहीन प्रवाशांसाठी आता पुणे रेल्वे स्थानकात “ब्रेल साइन’ (संकेतांक) बसवण्यात आले आहेत. या प्रवाशांना आता स्थानकाची माहिती तर मिळणारच आहे, शिवाय ते स्वावलंबी होणार आहेत.दरम्यान, पुणे हे भारतातील 16 वे “दृष्टीहीन मैत्रीपूर्ण स्थानक’ ठरले आहे.
पुणे रेल्वे स्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात असते. यामध्ये दिव्यांग, दृष्टीहीन प्रवाशांचा देखील समावेश आहे. परंतु, या प्रवाशांना अनेकदा इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना प्रवास करणे सोयीचे होण्यासाठी स्थानकाच्या परिसरात ब्रेल लिपीतील साइन बोर्ड बसवले आहेत.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन डायरेक्टर सुरेशचंद्र जैन यांच्या सहकार्याने “अनुप्रयास’ या सामाजिक संस्थेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
स्थानकावरील प्लॅटफॉर्म, वेटिंग हॉल, क्लोक रूम, आरक्षण कार्यालय, फूट ओव्हर ब्रिज, स्टेशन मास्तरांचे कार्यालय, शौचालय, प्लॅटफॉर्म रेलिंगसह विविध ठिकाणी “ब्रेल’ सांकेतांक बसविले आहेत. स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ब्रेल लिपीमध्ये स्टेशन ले-आउट आणि नकाशादेखील लावला आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकावरील सोयीसुविधा माहिती समजणार असून, यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे.