SPPU: पदवीप्रदान समारंभापासून विद्यार्थीच अनभिज्ञ, विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या सोमवारी पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या कार्यक्रमाची माहिती फक्त दोन दिवस आधी जाहीर करण्यात आली. केवळ दोन दिवस आधीच कार्यक्रम जाहीर केल्याने, या कार्यक्रमापासून विद्यार्थीच अनभिज्ञ आहेत. त्यावरून विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुणे विद्यापीठाकडून पदवीप्रदान कार्यक्रम सोमवारी होणार असल्याची माहिती आज देण्यात आली. या पदवीप्रदान कार्यक्रमास “ऑस्ट्रेलियन काऊंसलेट जनरल’ पिटर ट्रसवेल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमास महत्त्वाची व्यक्ती उपस्थित असतानाही कार्यक्रमाची घोषणा करण्यास इतका वेळ का लावण्यात आला? कार्यक्रमाची एवढी गोपनीयता का ठेवण्यात आली, असा प्रश्न करीत विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनास जाब विचारला आहे.
दरवर्षी कार्यक्रमापूर्वी आठवडाभर आधी प्रसारमाध्यमांना पदवीप्रदान कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली जाते. त्याचवेळी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर कार्यक्रमाची निमंत्रित पत्रिकाही प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पदवीप्रदान समारंभाची माहिती होते. त्यादृष्टीने विविध शाखांत प्रथम आलेले विद्यार्थी पदवीप्रदान कार्यक्रमास येण्यासाठी नियोजन करतात. यंदा मात्र ऐनवेळी कार्यक्रमाची घोषणा केल्याने विद्यार्थीही चक्राहून गेल्याचे दिसून येत आहे.




