पुणे : काही संघटना ‘बंद’वर ठाम, काही संमिश्र भूमिकेत

पुणे – उत्तरप्रदेशातील लखिमपूर येथील आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवून त्यांना मारण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही संघटनांनी संमिश्र भूमिका घेतली आहे. तर, कष्टकरी संघटनांनी बंदला प्रतिसाद देण्याचे ठरवले आहे. मार्केट यार्ड पूर्णपणे बंद राहणार असून, फॅशन स्ट्रीट व्यापारी संघटनांचा बंदात सहभागी होणार आहेत.
नियोजनासाठी बैठक
बंदबाबत नियोजनाच्या बैठकीला पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत बधे, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळासाहेब मारणे, शेतकरी बचाव कृती समितीचे नितीन पवार, स्वप्नील फुसे आदी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निर्धार सभा होईल.
कडक पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी मोर्चाच्या बंदोबस्ताबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेश जारी केला आहे. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, दोन उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, 13 पोलीस निरीक्षक,
76 सहायक पोलीस निरीक्षक, 87 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे
4 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील.
फॅशन स्ट्रीट व्यापाऱ्यांचा सहभाग
सोमवारच्या बंदमध्ये फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिक संघटना देखील सहभागी होणार आहेत. सोमवारच्या (11 ऑक्टोबर) बंदमध्ये राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसकडून (इंटक) विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती इंटकचे उपाध्यक्ष आणि फॅशन स्ट्रीट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी ऍड. म. वि. अकोलकर यांनी दिली.
कष्टकरी संघटना सहभागी होणार
अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीशी संलग्न असणाऱ्या संघटनांनी बंद पाळण्याचा घेतला आहे. शिवाय, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, टेम्पो पंचायत, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे रिक्षाचालक, आम आदमी रिक्षा संघटनादेखील सहभागी होणार आहे. दरम्यान मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील व्यापारी आणि कामगारांनी यापूर्वीच या बंदला पाठिंबा दिला आहे.
लखिमपूर येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारच्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत. करोना काळात व्यापार बंद राहिल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारण्याच्या प्रकाराचा संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो.
– सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ
पुणे व्यापारी महासंघ दुपारपर्यंत दुकाने ठेवणार बंद
सोमवारच्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने पाठींबा दिला आहे. सोमवारी (दि.11) दुपारी 3 वाजेपर्यंत लक्ष्मी रस्त्यासह सर्वच व्यापारी पेठांमधील दुकाने बंद राहणार आहेत. मात्र, दुपारी तीननंतर दुकाने उघडण्यात येणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली. व्यापारी कोणत्याही पक्षाचा नसतो. सध्या नवरात्र सुरू आहे.
लॉकडाऊनमधून आताच व्यापारी बाहेर आले आहेत. त्यामुळे व्यावसाय करण्याची परवानगी देण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होती. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दुपारी 3 पर्यंत दुकाने बंद ठेवत पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यानुसर पुणे व्यापारी महासंघाची ऑनलाइल मीटिंग घेण्यात आली.





