Pune: ई-बसच्या काॅम्प्रेसरमधून धूर; कर्वे रस्त्यावरील दुर्घटना

पुणे – कर्वे रस्त्यावर सकाळी दहा वाजल्यापासून कमी-अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास अति महत्वाची व्यक्ती मयुर काॅलनीतून करिश्मा चौकमार्गे पुढे मार्गस्थ झाली.
त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच कोंढवा गेट येथून हडपसरकडे (भेकराईनगर) निघालेली ई-बस कर्वे रस्त्यावरील मारूती मंदिर बसस्टाॅप येथे प्रवाशांना घेण्यासाठी थांबली. प्रवासी घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होताना बसमध्ये धूर झाला आणि प्रवासी घाबरले. शनिवारी (दि. २०) दुपारी सव्वाबारा वाजता कर्वेरस्त्यावरील करिश्मा चौकात ही घटना घडली.
चालकाने बस तत्काळ रस्त्याबाजूला घेतली. मात्र, तोपर्यंत घाबरलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू आणि बाहेर पडण्याची धडपड सुरू झाली. एका प्रवाशाने दरवाजाच्या बाजूची काच फोडली आणि बाहेर उड्या मारल्या. बसमधून आरडाओरडा सुरू झाली, त्यावेळी करिश्मा चौकात वाहतूक नियमासाठी असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, चालक आणि वाहकाच्या मदतीने बसचे दार उघडले.
त्यानंतर सर्व प्रवासी सुखरूपणे खाली उतरले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख, ननावरे, यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी शोभा देसाई, सुहास चोरमले, प्रवीण जाधव, सुरज सपकाळ आणि युवराज काळे यासह अन्य कर्मचारी आणि नागरिकांनी मदत केली.
गोंधळ, आरडा-ओरड, चेंगरा चेंगरी
कोंढवा गेट ते भेकराईनगर या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मारूती मंदिर येथे बस आल्यावर बसगर्दीने भरली होती. त्यात बसमध्ये धूर पसरू लागताच बसपेट घेणार या भितीने प्रवाशांचा गोंधळ, आरडा-ओरड सुरू झाली. ही ई-बस त्यामुळे हवा जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी खिडकी नाही.
बसमध्ये लहान मुले, वृध्द व्यक्ती, शाळकरी मुले यासह 40 ते 50 प्रवासी होते. त्यामुळे गर्दीत चेंगरा चेंगरी झाली. यावेळी एकाने जवळच असलेल्या हातोड्याने बसच्या खिडकीची काच फोडली आणि बाहेर पडले. त्यानंतर बसचे दार उघडल्यावर अन्य प्रवासी बाहेर पडले. यावेळी लहान मुलांना धूर आणि चेंगरा चेंगरीत गुदमरल्याचा त्रास झाला.





