Pune : गायनामुळे लय आत्मसात करता आली

पुणे : गायन शिकल्यामुळे मला लय आत्मसात करता आली. संगीतामध्ये लय महत्त्वाची असते. बेसूरा खपून जातो. पण,बेताल लगेच ओळखता येतो, असे पूर्वीचे कलाकार जे म्हणत त्यामध्ये तथ्य असल्याचे मत ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी व्यक्त केले. पुलोत्सवमध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते उस्ताद अमजद अली खाँ यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यानिमित्त मकरंद ब्रह्मे यांनी अमजद अली खाँ यांची मुलाखत घेतली. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आणि बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात निवृत्तीचे वय ठरलेले असते. कलाकार ठरवून नाही तर, आपोआप थांबतो. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी वादन करतोय. १९६३ मध्ये अमेरिकेची यात्रा केली आणि त्यानंतर कधी शाळेत गेलोच नाही.
पण, अयान आणि अमान हे दोघेही पदवीधर आहेत. घरात संगीत असलेल्या कुटुंबातील मुले जबाबदारी समजू शकले तर घराणे पुढे जाते, माझ्या वाद्याला मुंबईचे दमट हवामान मानवणारे नव्हते. चित्रपटासाठी वादन करणे माझी इच्छा नव्हती. शास्त्रीय संगीताने आणि रसिकांनी माझ्यावर इतके प्रेम केले की चित्रपटाच्या मोहमयी दुनियेत रमावे असे कधी वाटलेच नाही. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
मैफल विनामूल्य असू नये
शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य करतो असे काही संस्था गौरवाने सांगतात. संगीत मैफल विनामूल्य असू नयेत. कला आणि संगीताचा आदर करण्यासाठी मूल्य आकारले गेले पाहिजे. धार्मिक स्थळांमध्ये आपण दक्षिणा देतो. संगीताच्या प्रेमापोटी काही मूल्य द्यायला काय हरकत आहे, असा प्रश्नही अमजद अली खाँ यांनी उपस्थित केला.





