Pune : भोगीच्या भाज्यांची भरभरून खरेदी

पुणे : भोगीसाठी विविध प्रकारच्या फळभाज्यांची भाजी केली जाते. यासाठी लागणाऱ्या भाज्यांची खरेदी करण्यासाठी शनिवारी (दि.११) महात्मा फुले मंडई परिसर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक चांगली होत आहे. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत दरात ५ ते १० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भोगीच्या दिवशी घरोघरी १६ प्रकारच्या भाज्यांची भाजी केली जाते. त्यामुळे दोन दिवस आधीपासूनच गृहिणी या भाज्यांची खरेदी करीत असतात. शनिवारच्या सुट्टीमुळे अशा भाज्यांच्या खरेदीसाठी वाढलेल्या गर्दीमुळे मंडई परिसर गजबजून गेला होता. सोमवारी भोगी आहे, त्यामुळे रविवारीही भाज्या खरेदीसाठी गर्दी कायम राहणार असल्याचे भाजी विक्रेते अशोक गावडे यांनी सांगितले.
भोगीला ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेवून अनेक शेतकरी विविध भाज्या राखून ठेवत असतात. भोगीच्या दोन दिवस आधीपासून भाज्या विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जातात. यंदाही शेतकर्यांनी राखून ठेवलेल्या भाज्या विक्रीसाठी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. पापडी, पावटा, घेवडा, मटार, वांगी, गाजर, डबल-बी, वाल, भुईमुग आदीची पुणे जिल्हा आणि विभागातून आवक होत आहे.
भोगीच्या भाज्यांना ग्राहकांकडून मागणी चांगली असल्याने भाज्यांना दरही चांगला मिळत आहे. संक्रांतीपर्यंत फळभाज्यांचा तसेच वाण साहित्याचा दर टिकून राहणार असल्याचेही अशोक गावडे यांनी सांगितले.
भाज्यांचे किलोचे दर
भाजी / दर रूपये
निळी पापडी / 140 ते 160
सुरती पापडी /120
पावटा / 120 ते 140
काळा घेवडा / 100 ते 120
वाघरा घेवडा /100 ते 120
डबल बी / 100 ते 120
भुईमुग / 140 ते 160
वालाची शेंग / 100 ते 120
मटार / 50 ते 60
गाजर / 50 ते 60
वांगी / 60 ते 80
वाण साहित्याला मागणी
संक्रांतीच्या दिवशी महिलांकडून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात सहभागी महिलांना वाण दिले जाते. त्यामुळे वाण साहित्याला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. वाण साहित्यात गव्हाच्या ओब्या, ऊस, हरभरा गड्डी, ज्वारीचे कणीस, बोरे, तिळाची वडी आदींचा समावेश असतो. ऊस, ओब्या, हरभरा गड्डी, ज्वारीच्या कणीसाचा दर 15 ते 20 रूपये आहे. तर, बोरे 100 रूपये किलो आहेत. तिळाच्या वडीचा दर मात्र 10 ते 50 रूपयापर्यंत आहे. वाणाच्या साहित्याचे दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत टिकून आहेत.





