Pune Shops Timings : पुण्यात २४ तास दुकाने सुरू, पण ‘या’ गोष्टींवर रात्री १० नंतर थेट बंदी; अमितेश कुमार यांचा खुलासा
Pune Shops Timings : व्यापाऱ्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र 'नोडल ऑफिसर'ची नियुक्ती; पोलीस आयुक्त कार्यालयातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय.

Pune Shops Timings – शहरातील सर्व अधिकृत, परवानाधारक दुकाने तसेच आस्थापने कायद्यानुसार २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट करत पुणे पोलिसांनी व्यापारी वर्गातील संभ्रम दूर केला आहे. मात्र, खाऊ गल्ल्या नियमाप्रमाणे दहालाच बंद होतील, असेही स्पष्ट केले आहे. व्यापारी वर्गाच्या विविध समस्या, दुकाने आणि आस्थापनांच्या वेळांबाबत निर्माण झालेला संभ्रम, पोलिसांकडून होणारी अंमलबजावणी,
तसेच व्यापारी आणि पोलीस प्रशासनात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात विशेष समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते यांच्यासह भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुप्ता आणि विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय व्यापाऱ्यांच्या तक्रारी व समस्यांचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्ग, पोलीस प्रशासनातील संवाद अधिक प्रभावी होऊन व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत व्यापारी हित जपण्यासाठी पोलिस प्रशासन आणि व्यापारी संघटना संयुक्तपणे काम करतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यांना दहा वाजेपर्यंतच परवानगी
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरातील सर्व परवानाधारक दुकाने व आस्थापने २४ तास व्यवसाय करू शकतात. मात्र, टपऱ्या, हातगाडी व्यावसायिक, फेरीवाले, पानटपऱ्या आणि तत्सम व्यवसायांना रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी राहील. या निर्णयामुळे शहरातील विविध भागांत दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळांबाबत असलेला संभ्रम दूर झाला असून, अंमलबजावणीत एकसमानता येण्यास मदत होणार आहे. व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.





