Pune : धक्कादायक बाब.., जीबीएसमुळे दृष्टीवरही परिणाम

पुणे : शाळेत पालकांशी बोलताना शिक्षिकेला अचानक अंधूक आणि एकच व्यक्ती दोन असल्यासारखे दिसायला लागले. त्यामुळे क्षणभर डोळ्यावर घाण आली का? म्हणून डोळे पुसले. तरीही दृष्टी स्पट होईना. वाचा जड झाली आणि घाबरलेल्या शिक्षिकेने तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावून डाॅक्टरांच्या सल्ल्याने तपासणी केली असता जीबीएसमुळे संबंधित महिला शिक्षकेच्या दृष्टीवर परिणाम झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सिंहगड रोडवरील किरकटवाडी परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेबाबत घडलेली ही घटना आहे. संबंधित शिक्षिका नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या. पालकसभा असल्याने त्या पालकांशी बोलत असताना त्यांना अचानक एकाच व्यक्तीच्या दोन प्रतिमा दिसू लागल्या. डोळ्यांवर ताण येऊ लागला. त्यांनी डोळे पुसले, तरीही प्रतिमा स्पष्ट दिसत नव्हती आणि वाचा जड झाली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने फोनवरून पतीला हा सर्व प्रकार सांगितला आणि तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या.
डोक्याचा एमआरआय आणि आवश्यक त्या तपासण्या केल्यावर शिक्षिकेला जीबीएसची लागण झाल्याचे तसेच त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तत्काळ दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास आठ दिवसांच्या उपचारात इंजेक्शनसह अन्य उपचार देण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले.
आळस आम्हाला जीबीएसपर्यंत घेऊन गेला…
इमारतीमध्ये पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे आम्ही परिसरातील आरओचे पाणी घेऊन येतो. मात्र, ज्या दिवशी पाणी घेण्यासाठी गेलो, त्यावेळी आरओ मशीन बंद होती. पुढे जावून पाणी आणण्याचा आम्ही कंटाळा केला आणि घरातील नळाला येणारे पाणी चांगलेच आहे, असा विचार करून एक दिवस ते पाणी पिले. त्यानंतर मला आणि पतीला जुलाब झाले, पण त्यावेळी फारसा त्रास जाणवला नाही, त्यामुळे घरीच औषधोपचार घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी नाकातून पाणी येत होते. त्यावेळी सर्दी होतेय असे वाटले. मात्र, अचानक दृष्टीचा परिणाम झाल्यावर मी डाॅक्टरांकडे गेल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
लक्षणे दिसताच मी तत्काळ उपचार घेतल्यामुळे पुढील धोका टळला, असे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, अजूनही मला पहिल्यासारखे स्पष्ट दिसत नसून प्रतिमा दोन दिसतात. कुटुंबासाठी मला नोकरीची गरज आहे, पण या आजारामध्ये रिकव्हरी हळूहळू होते असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे अजून किती दिवस लागणार, मी शाळेत कधी जाईल याची चिंता आहे.
– जीबीएस बाधित शिक्षिकाबीएसमुळे संबंधित महिलेच्या डोळे, घसा आणि जीभ या नसांवर परिणाम झाला. त्यामुळे त्यांना वाचा जड होणे, प्रतिमा दोन दिसणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यांना तत्काळ उपचार देण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
– डाॅ. विशाल देशपांडे, न्युरोलाॅजी विभाग





