Pune : शिववारसा गौरव आनंद सोहळा उत्साहात

पुणे – छत्रपती शिवरायांच्या १२ दुर्गांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली. यानिमित्त शिवभक्त व शाहीरांचा शिववारसा आनंद सोहळा पार पडला. या वेळी हातात भगवे झेंडे घेऊन बालशाहीरांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.
श्री शिवनेरी स्मारक समिती आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणेच्या वतीने लालमहाल चौकात ‘शिववारसा’ गौरव आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पुणेकरांना साखर वाटण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, तेजपाल शहा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेले आहेत.
हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. शाहिरांनी आजपर्यंत शिवरायांच्या शौर्याची आणि या शौर्यस्थळांची कीर्ती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य केले. आता हा दर्जा मिळाल्याने साता समुद्रापार कीर्ती पोहोचणार आहे, असे मावळे म्हणाले.





