पुणे: शिवसृष्टी फक्त पर्यटनस्थळ नसून, राष्ट्रकार्य असल्याचे सांगत, ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च, तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार विजय शिवतारे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, डॉ विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, या शिवसृष्टीचं वर्णन करायचं झालं तर मी एवढचं म्हणेन की मी निशब्द आहे. इथे तयार करण्यात आलेले तुळजाभवानी मातेचं मंदिर भव्य आणि हुबेहूब आहे. इथे अर्ध्या तासात मांडलेला इतिहास अवर्णनीय होता, शिवसृष्टीला जास्तीत जास्त वास्तविक बनवण्यासाठी घेण्यात आलेल्या कष्टांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या शिवसृष्टीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला असला तरी, हे फक्त पर्यटनस्थळ नसून शिवाजी महाराज यांच्या सारख्या श्रीमंत योग्याचे हे मंदिर आहे. हे प्रेरणेचे आणि अभ्यासाचे स्थळ असल्याचेही फडणवीस म्हणाले. शिवशाहीर आणि इतिहासकार बाबासाहेब पुरंंदरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शिवसृष्टी चार टप्प्यात पूर्ण केली जात आहे. यासाठी ४३८ कोटी रुपये खर्च होणार असून, शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ८७ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षात बाकीचे दोन टप्पे पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानाचे जगदीश कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अजित आपटे यांनी केले तर प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी आभार मानले.