Pune : शिवसेना पुणे शहरप्रमुख भानगिरे यांचे एकनाथ शिंदे यांना लिहलेले पत्र व्हायरल

हडपसर – महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निकालानंतर विधानसभेतील कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिक भावनिक झाले. पुणे शहरातील एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून प्रमोदनाना भानगिरे यांची ओळख आहे.
एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात भानगिरे म्हणतात की, साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा तुम्हाला मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छिते. कार्यकाळ संपल्यानंतर नियमाप्रमाणे राजीनामा द्यायचा असतो हे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला ठाऊक आहे, मात्र त्याही पेक्षा मनाची घालमेल जास्त आहे. कारण, साहेब मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील कोट्यावधी शिवसैनिक मुख्यमंत्री असल्यासारखे आत्तापर्यंत जाणवत होते. अनेक शिवसैनिकांना वर्षा निवासस्थान म्हणजे दुसरे घर की काय, इतका सहज वावर तिथे करता येत होता.
राज्यातील बळीराजा, माता -भगिनी, युवा उद्योजक, लाखो तरुणांची भावना एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या जनतेवर एवढे भरभरून प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेने कधीच बघितला नव्हता. तुम्ही पुनश्च मुख्यमंत्री होणार हीच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाची अंतर्मनातील भावना आहे. राजकारणात भावनिक होऊन चालत नसतं हे जरी तुम्ही आम्हाला शिकवलेलं असेल तरीही आज आई तुळजाभवानीची कृपा नक्की होईल हा माझा विश्वास आहे.
शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या या पत्रानंतर राज्यातील अनेक शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर CM 2.0 हा ट्रेंड चालवायला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





