PUNE: सॅनिटरी नॅपकिन देण्यास शिवसेना तयार; प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे मनपा आयुक्तांना विनंती

पुणे– सॅनिटरी नॅपकिन पुरवठा वेळेवर पुरवण्यात मनपा यंत्रणेला काहीसा उशीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मनपाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार आहोत, अशी माहिती शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली. याबाबत महापालिका आयुक्तांना विनंती करण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांंगितले.
मनपाच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थिनींना दरवर्षी सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वितरण केले जाते. मात्र, सन २०२० पासून पालिकेने सलग दोन वर्षे करोनाचे कारण देत तर त्यानंतर दोन वर्षे निविदांमध्ये सुरू असलेल्या ठेकेदारांच्या वादातून नॅपकिनच खरेदी केलेले नाहीत. परिणामी, मुलींना अनारोग्याचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका थेट केंद्रीय संस्थेकडून हे नॅपकिन घेणार असली, तरी त्याला उशीर होणार आहे.
त्यामुळे महापालिकेला हवे तेवढे सॅनिटरी नॅपकिन देण्याची तयारी शहर शिवसेनेकडून असल्याचे भानगिरे यांनी सांगितले. तसेच याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील आठवड्यात आयुक्तांची भेट घेणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.




