Pune | साडी वाटणारा शेठ, साहेब पुन्हा अवतरले!

पुणे – “शेठला मुलगा झाला आहे, ते गरिबांना मोफत साडी वाटत आहेत. तुम्ही अंगावरचे दागिने काढून ठेवा. तुम्हाला साडी मिळेल’ अशी बतावणी करुन शहरात ज्येष्ठ महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक करणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. मध्यंतरी काही महिने अशा घटना थांबल्या होत्या. मात्र, हे भामटे पुन्हा अवतरले आहेत.
साडी वाटपाच्या नावे महिलांना फसवल्या प्रकरणात शहरातील काही पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अशी बतावणी करणाऱ्या गुन्हेगारांची एक कार्यपद्धती असते. ते दुपारच्या वेळी गर्दी नसणाऱ्या आणि गल्ली-बोळांतील रस्त्यांवर दबा धरुन थांबतात. एखादी ज्येष्ठ महिला येताना दिसताच, तिच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन करतात. यानंतर “आमच्या शेठला मुलगा झाला असून ते गरिबांना मोफत साडी किंवा पैसे वाटत आहेत, असे आमिष दाखवतात.
यानंतर महिलेला गरीब दिसण्यासाठी अंगावरचे दागिने काढून एका पुडीत बांधून ठेवायला सांगतात. ही पुडी तिच्या पिशवीत ठेवण्याचे निमित्त करन ती हातचलाखीने लांबवली जाते. यानंतर आरोपी गल्लीबोळांतून पळ काढतात. अनेक गल्लीबोळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचा माग काढणे अवघड बनते. याअगोदर अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या काही जणांना अटक केली होती. जामिनावर बाहेर पडल्यावर ते पुन्हा असे गुन्हे करतात.’
घटना क्र. १
आंबेगाव पठार येथील ५० वर्षीय महिला स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकातून पायी जात होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना “पंजाबहून आलेले साहेब गरीब महिलांना मोफत धान्य आणि पैसे वाटत आहेत,’ असे सांगितले. त्यासाठी गरीब दिसणे आवश्यक असून अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. यानंतर हातचलाखीने दागिने काढून “आम्ही साहेबांना घेऊन येतो’ असे सांगत पळ काढला. महिलेने बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पिशवी तपासली असता, त्यातील दागिने गायब झाल्याचे आढळले. यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड करत आहेत.
घटना क्र. २
“तुम्हाला आमच्या शेठकडून धान्य मिळवून देतो,’ असे सांगत एका ६४ वर्षीय महिलेचे सुमारे ६० हजारांचे दागिने हातचलाखीने चोरण्यात आले. ही घटना न्यू टिंबर मार्केट भवानी पेठ येथे बुधवारी घडली. या प्रकरणी महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कष्टकरी महिलांना मानसिक धक्का
हातावर पोट असणाऱ्या असणाऱ्या तसेच घरकाम करणाऱ्या महिला या भामट्यांच्या आमिषाला सहजासहजी भुलतात. वर्षानुवर्षे मेहनत करुन खरेदी केलेले काही हजारांचे दागिनेही हे भामटे सोडत नाही.अशा लुबाडणूक प्रकरणाचा या महिलांना मोठा मानसिक धक्का बसलेला असतो,’ असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.




