Pune : समाविष्ट १६ गावांच्या सांडपाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

पुणे – महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठीच्या सांडपाणी प्रकल्पास केंद्रशासनाने अमृत २.० योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यशासनाकडूनही या प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यात मान्यता दिली आहे. या कामासाठी सुमारे ३३२.३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या निधीतून १६ गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.
नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै रोजी झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी सादर करण्यात आलेल्या सुमारे १४३७.९४ कोटी रुपयांच्या विस्तृत मलनिस्सारण प्रकल्प तयार केला असून दोन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे.
त्यात या प्रकल्पात जुन्या कमी क्षमतेच्या मलवाहिन्या बदलणे, नव्याने मलनिस्सारण जाळे उभारणे, मलशुद्धीकरण केंद्रे (एसटीपी), फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट आणि सक्शन व्हेईकल्स अशी विविध कामे प्रस्तावित आहेत.
पहिल्या टप्प्यास मंजुरी १६ गावांसाठी सुमारे ३३२.३० कोटी रुपये खर्चाचा मलनिस्सारण प्रकल्प टप्पा-१ मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. या टप्प्यात ३०० मिमी ते १२०० मिमी व्यासाच्या पाईपद्वारे १८७.०६ किलोमीटर सीवरेज नेटवर्क, ४५.०९ किलोमीटर मुख्य मलवाहिन्या आणि ३७.९१ किलोमीटर सध्याच्या मलवाहिन्यांचे दुरुस्ती व स्वच्छता कामे केली जाणार आहेत. यात सूस, म्हाळुंगे, नर्हे, लवसोळी, सणसनगर, कोंढवे-धावडे, कुरकुंभवाडी, नांदोशी, खडकीबाजार, नवीन कोरेगाव, नांदेड, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोथेवाडी, मांगेवाडी या गावांचा समावेश आहे.
असा असेल दुसरा टप्पा
या प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणून १८०.०१ कोटी रुपयांच्या मलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. म्हाळुंगे, लवसोळी, नांदेड आणि गुजर निंबाळकरवाडी या गावांत एकूण ८२ एमलडी क्षमतेची चार एसटीपी आणि ७० केएलडी क्षमतेची दोन एफएसटीपी उभारण्यात येणार आहेत. यात औताडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बु. यांसह सात गावांचा समावेश असून, ८५६.९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.




