pune : शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी

पारा ६ अंशापर्यंत घसरला; हंगामातील कमी तापमानाची नोंद
पुणे – थंडीचा पाऱ्याने शहरासह उपनगरांत नीच्चांक गाठल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकर चांगलेच गारठले आहेत. गेल्या २४ तासांत कडाक्याच्या थंडीने हवेली परिसरात यंदाच्या हंगामातील नीच्चांकी ६.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पाषाण, एनडीए, शिवाजीनगर, वारजे, आंबेगाव, धायरी या परिसरासह जिल्ह्यातही हुडहुडी वाढली असून, येथील पारा एक अंकी नोंदविला आहे.
शहरासह जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असल्यामुळे थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या ४८ तासांत हवेली आणि माळीण परिसरातील किमान तापमान १० अंशांच्या खाली होते. मात्र, आज किमान तापमानात लक्षणीय घट झाली आणि थंडीचा जोर वाढला.
हवेली आणि माळीण परिसरातील ८ ते ९ अंशांवरील किमान तापमान आज ६ अंशांपर्यंत खाली आले, तर शिवाजीनगर, पाषाण आणि तळेगाव दाभाडे परिसरातील ११ ते १२ अंशांवरील किमान तापमानही आज ९ अंशांच्या खाली उतरले.
त्यामुळे पहाटेपासून वाढलेल्या कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले असून, बहुतांश भागात धुक्यांनी परिसर व्यापून टाकला होता. परिणामी आज दुपारीही हवेत गारवा जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहणार असून, थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान
हवेली ६.९, बारामती ८.९, पाषाण ९, माळीण ९.२, शिवाजीनगर ९.४, तळेगाव दाभाडे आणि दौंड ९.९, आंबेगाव १०.७, भोर १२.१, लोहगाव १३.३, शिरूर १४, चिंचवड १४.५, वडगावशेरी १५.८, गिरीवन १६.५ अंश सेल्सिअस.





