Pune : १३९ कोटींच्या सुरक्षा रक्षक निविदेस मंजुरी

पुणे – महापालिकेच्या विविध इमारती, रुग्णालये, उद्याने, मुख्यालय आणि झोन कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी १३९ कोटी ९२ लाख रुपयांच्या निविदेला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निविदांसाठी तीन ठेकेदार पात्र झाले होते. त्यांनी १६ ते १८ टक्के वाढीव दराने निविदा भरल्या होत्या.
मात्र, त्यावर आक्षेप आल्यानंतर प्रशासनाकडून दर कमी करण्यासाठी ठेकेदारांशी चर्चा करून अखेर २ टक्के वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १५६५ सुरक्षा रक्षक नेमण्याचे काम तीन ठेकेदारांना विभागून देण्यात येणार आहे.
प्रशासनाने तीन वर्षांसाठी काढलेल्या या निविदा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरल्या होत्या. आधी अटी आणि शर्थी, नंतर महापालिकेने अनियमिततेची कारवाई करूनही पात्र केलेले ठेकेदार, त्यानंतर तब्बल १६ ते १८ टक्के जादा दराने आलेल्या निविदा आदींमुळे या निविदांवर आक्षेप घेण्यात आला होता. महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांची अचूक संख्या, त्यांचे कामाचे स्थळ, पाळीवार नेमणूक, त्यांना देण्यात येणारे वेतन याची ठोस नोंद नसल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून निविदा मंजूर करण्याची मागणी होत होती.
मात्र, अखेर प्रशासनाने या निविदांना मंजुरी दिली आहे. आता सुरक्षा विभागाकडून आणखी सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली असून, या वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्तावही पुढील आठवड्यात स्थायी समितीत सादर केला जाणार आहे.





