काठिण्यपातळी वाढण्याची शक्यता पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने द्वितीय सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी प्रसिद्ध केले. या परीक्षा ऑनलाइन आणि बहुपर्यायी प्रश्नांद्वारे (एमसीक्यू) येत्या 12 जुलैपासून सुरू होतील. परीक्षा वेळेत सुरू होत असून, त्याचा निकालही महिनाभरात जाहीर केला जाणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. परीक्षा विभागाने पहिल्या टप्प्यात अंतिम वर्ष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच सर्व पदविका अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. पदवी आणि पदव्युत्तरच्या अन्य वर्षातील अभ्यासक्रमाचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध होतील. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप, मोबाइलद्वारे सोयीच्या ठिकाणाहून परीक्षा देण्याची मुभा आहे. या परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होतील. एक सत्रात एकाच वेळी जवळपास 30 हजार परीक्षा देतील, या दृष्टीने परीक्षेचे नियोजन आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीनुसार परीक्षा होतील. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. तसेच, यंदा प्राध्यापकांनी प्रश्नसंचांची संख्या वाढवून दिली आहे. त्यामुळे परीक्षेची काठिण्यपातळी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. स्टुडंट प्रोफाइल अपडेट करावी ऑनलाइन परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकाचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी िीीर्.ीपळर्िीपश.रल.ळप यात लॉग-इन करून तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारी योग्य पद्धतीचे असणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने होण्यासाठी स्टुडंट प्रोफाइलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: इमेल आयडी, मोबाइल क्रमांक अपडेट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी होणार “मॉक टेस्ट’ द्वितीय सत्राची परीक्षा सुरू होण्यापूर्वी सराव परीक्षा घेतली जाणार आहे. सराव परीक्षा दि. 9 ते 10 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी सर्वसाधारण प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा होतील. योग्यपणे ऑनलाइन परीक्षा देता यावी, यासाठी विद्यार्थ्यानी सराव परीक्षा द्यावी, असे परीक्षा विभागाने म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे निकाल दि. 15 ऑगस्टपर्यंत जाहीर केले जातील. त्यामुळे परदेशात अथवा अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. त्यादृष्टीने परीक्षेचे नियोजन केले आहे. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ