Pune : घटस्फोट न घेता दुसरे लग्न, पहिल्या पत्नीने विवाह समारंभात घातला राडा

पुणे : कोरेगाव पार्क येथील एका बड्या क्लबमध्ये झालेल्या विवाह समारंभात मोठा राडा झाला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पती दुसरा विवाह करीत होता. मात्र, पहिली पत्नी कार्यालयात दाखल झाली. तिने स्टेजवर येऊन सत्य परिस्थिती सांगताच मोठा गोंधळ उडाला. यावेळी स्टेजवर आलेल्या तक्रारदार महिलेला तिच्या पतीच्या होणाऱ्या मेव्हण्याने धक्काबुक्की केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार शमी जोसेफ (४५, वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांचा विवाह झाला असून, त्यांची पतीबरोबर घटस्फोटाची केस सुरू आहे. दोघेही खासगी कंपनीत बड्या पदावर काम करतात. मात्र, त्यांच्या पतीने घटस्फोट होण्याअगोदरच दुसरा विवाह ठरवला. हा विवाह पुण्यातील बड्या क्लबमध्ये होणार असल्याची खबर मिळताच फिर्यादी मुंबईवरून तेथे दाखल झाली.
तिने विवाहसमारंभात स्टेजवर येत माईक हातात घेतला. यानंतर तिने पती घटस्फोट न घेताच बेकायदा दुसरा विवाह करीत असल्याचे सांगितले. यामुळे वऱ्हाडी मंडळींत मोठा गोंधळ उडाला. ही बाब तिच्या पतीच्या होणाऱ्या मेव्हण्यास लक्षात आली. त्याने स्टेजवर चढत फिर्यादीच्या हातातील माईक हिसकावून तिला खाली ढकलून दिले. यानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.




