Pune: स्कूल बसवर आता वायुवेग पथकांची नजर; आरटीओची कडक भूमिका

पुणे – शहरात स्कूल बस, व्हॅनमधील मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दोन दिवसांत दोन घटना घडल्या असून पुणे हादरून गेले आहे. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या चारित्र्याचा प्रश्न तर निर्माण होतो आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी पुणे आरटीओने कडक भूमिका घेत सर्व स्कूल बस, चालक आणि रिक्षा यांची तपासणी करण्यासाठी चार वायूवेग पथके नेमली आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली
चार लाखाचा दंड वसूल…
प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे (आरटीओ) यांच्याकडून शहरातील स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षांच्या तपासणीसाठी वायूवेग पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून पहिल्याच (दि.४) दिवशी ११७ स्कूल बस व व्हॅन चालकांना नोटीस देऊन चार लाख ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील विश्रांतवाडी, वडगावशेरी, विमाननगर, वाघोली, हडपसर, लोणीकंद, सासवड, सातारा रोड, बिबवेवाडी, कात्रज, खडकी आणि मशीन चौक परिसरातील शाळा परिसरासह रस्त्यावर धावणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली. दिवभरात जवळपास ४०० स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली.
या बाबींची तपासणी…
- वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का?
- चालकाचे चारित्र्य पडताळणी झाली का?
- बसमधील विद्यार्थ्यांची संख्या किती?
- मुलींच्या बसमध्ये महिला मदतनीस आहे का?
- यासह अन्य बाबींची तपासणी करण्यात आली.
“शाळांमध्ये जावून शिक्षक, विद्यार्थी यांना वाहतूक नियमनासह मुलांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची, विशेषत: लहान मुलींच्या सुरक्षिततेबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि सूचना केल्या. १८ शाळांना भेटी देऊन अधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली. एकूण कारवाईत पावणेपाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, यापुढे ही कारवाई सातत्याने सुरू राहील. सर्व स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षांवर पथकांची करडी नजर असणार आणि दोषींवर कडक कारवाई करणार आहोत.” – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी





