Pune : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम अर्थात तात्पुरता निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २९.९० टक्के, तर इयत्ता आठवीचा निकाल २३.७२ टक्के इतका लागला आहे.
राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाची जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली. परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्तीची परीक्षा दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून ६१ हजार ५५१ विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ५९ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १७ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्
याचप्रमाणे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३९ हजार १४८ विद्यार्थी नोंदणी केली. त्यातून एकूण ३७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ९५४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. सविस्तर माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





