Pune: शिष्यवृत्तीचा ३१ हजार ३९४ विद्यार्थ्यांना लाभ

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. पाचवीचा निकाल २४.९१ टक्के, तर आठवीचा निकाल १५.२३ टक्के निकाल लागला आहे. राज्यातील ३१ हजार ३९४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
राज्यात १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल ३० एप्रिलला जाहीर झाला. १० मे पर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे.
त्यावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय गुणवत्ता यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येणार आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेचा तपशील
तपशील – इयत्ता पाचवी – इयत्ता आठवी – एकूण
नोंदविलेले विद्यार्थी – ५१०६७२ – ३८१५८८ – ८९२२६०
उपस्थित विद्यार्थी – ४९२३७३ – ३६८५४३- ८६०९१६
अनुपस्थित विद्यार्थी – १८२९९- १३०४५- ३१३४४
पात्र विद्यार्थी – १२२६३६ – ५६१०९ – १७८७४५
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी – १६६९१- १४७०३ – ३१३९४
शेकडा निकाल – २४.९१ – १५.२३ – २०.७६
“रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाणार असून् संबंधित विद्यार्थ्यांची अर्हता रद्द होणार आहे.” – डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.





