Pune : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित

पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या तीन शिष्यवृत्ती योजनांचे महाविद्यालय स्तरावरील १९ हजार ३३ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. योग्य ती कार्यवाही करून महाडीबीटीवर पोर्टलवर हे अर्ज पाठविलेलेच नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना दिले आहेत.
यासंबंधीचे परिपत्रक पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डाॅ. डी. व्ही. जाधव यांनी काढले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डाॅ. पंजाबराव देशमुख व वसतिगृह निवार्हभत्ता योजना आणि उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तंत्रशिक्षण विभागाकडून राबविल्या जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात अर्ज करतात. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत महाडीबीटी पोर्टल वर सबमिट करणे गरजेचे आहे. परंतु विद्यार्थ्याने अर्ज केल्यानंतर महाविद्यालयस्तरावर काहीच कार्यवाही न करता अर्ज प्रलंबित ठेवले जातात. परिणामी, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता असते.
अर्ज प्रलंबित ठेवू नका, असे वारंवार तंत्रशिक्षण विभागाकडून सांगितले जाते. मात्र याबाबत महाविद्यालयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरुन तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संस्थेच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, असेही तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.
या आहेत शिष्यवृत्ती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती : ७ हजार ८०१
डाॅ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना : १० हजार ८१०
उच्च व्यावसायिक अभ्यासक्रम अल्पसंख्यांक योजना : ४२२




