Pune | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

पुणे – आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे यंदा दि. १८ ते रविवार दि. २२ डिसेंबर कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे ७० वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे हा सोहळा रंगणार आहे.
महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरू केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदा नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना “सवाई’सारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे.
यामध्ये शाश्वती चव्हाण- झुरंगे, कृष्णा बोंगाणे, नागेश आडगांवकर, अनुपमा भागवत, सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तळवलकर, अनुजा बोरुडे- शिंदे, अदिती गराडे, रिषित देसिकन, सौरभ काडगांवकर, अदनान सामी, आरती ठाकूर कुंडलकर, अतिंद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक हे पहिल्यांदाच आपली कला सादर करणार आहेत.
या महोत्सवाला कल्याणी समूह, किर्लोस्कर, नांदेड सिटी, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, केले रिअल्टर्स, रांजेकर रिअल्टी, लोकमान्य मल्टीपर्पज – को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना आणि आशा पब्लिसिटी यांनी प्रायोजकत्व दिले आहे. ही माहिती देताना आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंयद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे हे देखील उपस्थित होते.
महोत्सवाचे वेळापत्रक
दि. १९ : दुपारी ४ ते रात्री १०.००
दि. २० : दुपारी ४ ते रात्री १०.००
दि. २१ : दुपारी ४ ते रात्री १२.००
दि. २२ दुपारी १२ ते रात्री १०.००
डॉ. प्रभा अत्रे यांना गायनातून आदरांजली
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या शिष्यांच्या सहगानाने ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप होईल. या सहगानामध्ये आरती ठाकूर कुंडलकर, अतींद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक यांचा सहभाग असेल.





