PUNE: रूबी हाॅल ते रामवाडी मार्ग अंतिम टप्प्यात; मेट्रो रेल्वे आयुक्तालयाकडून सुरक्षा तपासणी पूर्ण

पुणे – वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्ग-२ वरील रुबी हाॅल ते रामवाडी या मार्गाचा प्रवास लवकरच पुणेकरांंच्या सेवेत सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, मार्ग आणि स्थानकांची पाहणी मेट्रो सुरक्षा आयुक्तालयाच्या ( सीएमआरएस) पथकाने पूर्ण केली आहे.
रुबी हाॅल ते रामवाडी या मेट्रो मार्गाची सुरक्षा पाहणी दोन दिवस करण्यात आली. त्यावर या पथकाने महामेट्रो प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. या सूचनांची पूर्तता केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या पथकाने या मार्गावरील बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी मेट्रो स्थानकांचीही पाहणी केली.
वनाज ते रामवाडी हा १६ किलोमीटरचा मार्ग असून, त्यातील वनाज ते रूबी हाॅल हा मार्ग आॅगस्ट २०२३ पासून सुरू झाला आहे. तर रूबी हाॅल ते रामवाडी या मार्गाचे काम ९५ टक्के झाले आहे. हा मार्ग सुमारे ५.५ किलोमीटर असून यात बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर तसेच रामवाडी ही स्थानके आहेत.
सुरूवातीला हा मार्ग येरवडा, शास्त्रीनगर, रामवाडी असा होता. मात्र, हा मार्ग हेरिटेज साइट असलेल्या आगाखान पॅलेसच्या समोरून जात असल्याने तसेच या साइटपासून १०० मीटर अंतरापर्यंत बांधकामास मनाई असल्याने हा मार्ग बदलून येरवडा येथून नदीपात्राच्या बाजूने कल्याणीनगर मार्गे रामवाडीपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामास विरोध यामुळे उशीर झालेला आहे.




