Pune: आरटीओ अखेर ‘अॅक्शन मोड’वर

पुणे – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा आणि व्हॅन तपासणीसाठी पुणे आरटीओकडून दहा पथके तैनात केली आहे. त्यामध्ये केवळ वाहनांची कागदपत्रच नव्हे तर बस, रिक्षा आणि व्हॅनमध्ये मदतनीस आहे का, चालक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी झाली का यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.
शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर होणाऱ्या अनुचित प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या.
त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राद्रेशिक परिवहन (आरटीओ) विभागाकडून शहरासह जिल्ह्यात शालेय वाहतूक करणाऱ्या सर्व बस, व्हॅन आणि रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पुणे आरटीओकडून दहा पथके तैनात केली असून, शनिवारी (दि. २४) सकाळपासून शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून शाळेच्या रिक्षा, बस आणि व्हॅनचालकांना थांबवून वाहनांची तपासणी करत आहे, असे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.
पथकाकडून कश्याप्रकारे होते तपासणी
– संबधीत शालेय वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा, व्हॅन यांची क्षमता किती आणि प्रत्यक्षात विद्यार्थी संख्या किती
– बस, रिक्षा, व्हॅनमध्ये मुली असतील तर महिला मदतनीस आहे का?
– चालक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी झाली का?
– वाहनांची नोंद शाळेला आहे का?
– विनापरवाना शालेय वाहतूक करणारे रडारवर
– फिटनेस सर्टिफिकेट, लायसन्स, पी.यू.सी. यासह आवश्यक कागदपत्रांची तपासणी
“शाळेतील मुख्याध्यापकांनी सर्व स्कूलबस चालकांची नेमणूक करण्यापूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. हलगर्जीपण केलेल्या वाहनचालक आणि मालकांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.” – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी.





