Pune : पाणीपट्टीची झाली 422 कोटींची वसुली

पुणे : खडकवासला पाटबंधारे विभागास 2024-25 यावर्षी पाणीपट्टीमधून 422 कोटी 45 रुपयांची पाणीपट्टी मिळाली आहे. सिंचनापेक्षा (शेतीला पाणी ) बिगरसिंचनामधून अधिक पाणीपट्टी वसुली झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहरासह जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती (काही भाग) तसेच इंदापूर तालुक्यातील शेती तसेच नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो.
याबरोबरच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, पाणी वापर संस्था यांना देखील पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून पुणे शहराची लोकसंख्या वाढल्याने सर्वात अधिक पाणी नागरिकांना पिण्यासाठी द्यावे लागत आहे.
त्यामुळे सिंचना (शेतीला पाणी) पेक्षा बिगर सिंचनास जास्त पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिगरसिंचनामधून जास्त पाणीपट्टी वसुल झाली आहे. मागील वर्षी (2023-24) 338 कोटी रूपये पाणीपट्टी वसुल झाली होती. मागील वर्षीपेक्षा सुमारे 85 कोटी रूपयांनी अधिक आहे.





