Pune : पुणे जिल्ह्यात वीजबिलांचे २०० कोटी थकले

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे १९९ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या ३५ दिवसांत ४२ हजार ७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरु आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेत महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ३११ कोटींची थकबाकी
पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.





