Pune : पुण्याचा रिंग रोड लवकर मार्गी लावावा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रिंग रोड प्रकल्प राज्य शासनाने त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान केली.
पुणे रिंग रोड संकल्पना सुमारे २७ वर्षांपूर्वी, १९९७ च्या प्रादेशिक आराखड्यात मांडण्यात आली होती. २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पुणे रिंग रोडचे काम देण्यात आले. सुमारे १७० किलोमीटरचा हा रस्ता असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या वाहतूक समस्यांना आळा बसण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२ हजार कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनाचे कामही ९० टक्के पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात काम काही चालू झाले नाही, असे शिरोळे यांनी सांगितले.
सद्यस्थितीत पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे, उड्डाणपुलांचे आणि मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीमध्ये अडथळा येतो. प्रामुख्याने पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडची संकल्पना मांडण्यात आली. पण, ती साकारण्यास खूप वर्षांचा विलंब झाला आहे. त्यात भूसंपादन होऊनही काही कारणाने प्रत्यक्ष काम रखडत असेल तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे गेली २७ वर्षे रखडलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार शिरोळे यांनी अध्यक्षांना केली.





