Pune : सुधारित नियम तातडीने रद्द करावा; डाॅ. गजानन एकबोटे; अकरावी इनहाउस कोट्यातील प्रवेश

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील संस्थांतर्गत कोट्यातील (इनहाउस) प्रवेशासाठीचा सुधारीत नियम विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याने तो ताबडतोब रद्द करावा आणि पूर्वीच्याच नियमाप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये अकरावी प्रवेशासाठी राखीव असणाऱ्या पाच टक्के इनहाउस कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतात. यापूर्वीच्या कालावधीमध्ये इनहाउस कोट्यामध्ये एकाच संस्थेची माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक नव्हते.
त्यामुळे एकाच संस्थेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या शहरातील किंवा प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणे शक्य होते. मात्र, यंदा संस्थेची माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात नसतील, अशा शाळांमधील दहावी विद्यार्थ्यांना इनहाउस कोट्यातून त्याच संस्थेच्या अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार नाही, असा नियम केला आहे. हा नियम अन्यायकारक आहे. त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी डाॅ. एकबोटे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
पालकांचीही मागणी
डाॅ. गजानन एकबोटे; अकरावी इनहाउस कोट्यातील प्रवेशशिक्षणमंत्री दादा भुसे यांनी इनहाउस कोट्यासंदर्भात संस्थाचालकांचे काही म्हणणे असल्यास ते ऐकून घेतले जाईल. त्यामध्ये काही बदल केले जातील, असे आश्वासन पुण्यात दोन दिवसांपूर्वी दिले होते. आता शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डाॅ. एकबोटे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे याबाबतच प्रवेश फेरी सुरू होण्यापूर्वी ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.





