Pune: सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्त्वावर

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड अर्हताधारक उमेदवारांची निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधनही देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाच्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहील. राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा. सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नुतनीकरण करता येईल. मात्र, हा एकूण कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षे असेल.
डी.एड, बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवाराच्या नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल, असे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





