Pune : सेवानिवृत्त एसीपींचे ट्रेकिंगवेळी निधन; सिंहगड चढताना हृदयविकाराचा झटका

पुणे : सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेले सेवानिवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड (६२, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांचे शनिवार सकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजकुमार गायकवाड हे आतकरवाडीमार्गे ट्रेकिंग करत गड चढत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली आणि काही क्षणांतच ते बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावले होते. त्यांच्या सोबत असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती वन विभागाचे समाधान पाटील यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिली. रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ अवघ्या सहा ते सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.
गंभीर स्थितीत असलेल्या गायकवाड यांना स्ट्रेचरवर रेस्क्यू व्हॅनमध्ये घालून मोरया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.





