Pune : वृक्षांची जबाबदारी उपअभियंत्यांवर

पुणे ; शहरातील विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामांमध्ये अडथळा ठरणारे अनेक वृक्ष काढावे लागले किंवा त्यांचे पुनर्रोपण करावे लागले. मात्र, नव्याने वृक्ष लागवड आणि त्यांची योग्य देखभाल न झाल्यामुळे शहरात वृक्षांची संख्या कमी झाली आहे, अशी तक्रार काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली होती.
याची दखल घेत महापालिकेने आता मिशन ३२ च्या माध्यमातून व्यापक वृक्ष लागवड मोहीम केली जाणार असून या वृक्षांचे संगोपन आणि जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाच्या उपअभियंत्यावर असणार आहे. विशेष बाब म्हणजे, वृक्ष संगोपनासाठी शक्यतो एसटीपी प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाणार आहे.
पुणे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करताना अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या पथविभागाने अखत्यारीतील ३२ रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी नवीन झाडे लावली जातील आणि त्यांची वाढ होईपर्यंत योग्य काळजी घेतली जाईल.
यासाठी संबंधित उपअभियंता आणि त्यांच्या कनिष्ठ अभियंत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील वृक्ष लागवडीचे पालकत्व स्वीकारावे लागणार आहे. तर, या ३२ अधिकाऱ्यांचीही यादीही पथ विभागाकडून जाहीर करण्यात आली असून त्यांना रस्ते विभागून देण्यात आले आहेत.
मिशन ३२ च्या माध्यमातून आम्ही केवळ नवीन वृक्ष लावणार नाही, तर त्यांची व्यवस्थित निगा राखण्याची आणि पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित करीत आहोत. त्यांना दर महिन्याला त्याचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांना सादर करणे बंधनकारक असेल.
– मुख्य अभियंता (पथ विभाग)




