पुणे | पुणेकरांना पडली निळ्या केळीची भुरळ
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : केळी हे सर्वसामान्यांचे फळ. आपण अनेक प्रकारच्या केळी खाल्ल्या असतील. त्यामध्ये गावरान, इलायची, सोनकेळीपासून ते अगदी हायब्रीड केळीपर्यंत. मात्र, गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजारात चक्क निळसर रंगाची व व्हॅनिला आइस्क्रिमसारखी चव देणारी केळी दाखल होऊ लागली आहे. बाजारात पहिल्यांदाच आलेल्या या केळींना किलोला ७० ते ८० रुपये भाव मिळाला. त्यामुळे या केळीचीच चर्चा बाजारात रंगली होती.
मार्केट यार्डातील विठ्ठलशेठ हरिभाऊ वायकर यांच्या गाळ्यावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातून या केळीची आवक झाली आहे. तेथील राजाभाऊ साहेबराव पाटील यांनी दोन एकरात निळ्या केळींची लागवड केली असून, १५ ते २० दिवसानंतर केळीची नियमित आवक सुरू होईल.
त्याअंतर्गत या काळात ४० ते ५० टन केळी निघण्याचा अंदाज आहे. बाजारात पाटील यांच्या बागेतून १६ किलोंची आवक झाली. घाऊक बाजारात त्यांना किलोला ७० ते ८० रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात त्याची १०० ते १२० रुपये डझन या दराने विक्री होईल, अशी माहिती केळीचे व्यापारी अनिकेत वायकर यांनी दिली.
निर्यातीच्या दृष्टीने जास्त महत्त्व
निळ्या रंगाच्या केळीचा हा वाण अमेरिका या देशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या केळीमध्ये व्हॅनिला फ्लेवर आढळतो. त्यामुळे या केळीचा वाण प्रसिद्ध आहे. निर्यातीसाठी या वाणाच्या केळीला जास्त महत्त्व आहे. या केळीची सालही निळ्या रंगाची आणि आतील गरही निळ्या रंगाचा असतो. त्यामुळे ही केळी आकर्षक दिसते. युरोपियन देशांत मागणी जास्त असल्याने भावही चांगला मिळतो. त्यामुळे निळ्या रंगाची ही केळी शेतकर्यांसाठी फायद्याची ठरते. आईस्क्रीम, कस्टर्ड बनवण्यासाठी या केळींना जास्त मागणी असते.
केळी………………………… गावरान केळी, सोनकेळी, लाल केळी, नेंद्रन केळी
आवक……………………………. १४ ते १५ पिकअप वाहन (दररोज)
कोठून…………………………….. पुणे, सोलापूर, अकलूज, इंदापूर, फलटण, नातेपुते, तामिळनाडू
घाऊक दर……………………….. १० ते ३५ रुपये (प्रतिकिलो)
किरकोळ दर……………………… ५० ते ६० रुपये (प्रतिडझन)




