Pune : कर्जाचा बोजा घरबसल्या उतरवा

पुणे – वाहनांवरील कर्जाचा बोजा आता घरबसल्या उतरवता येणार असून, त्यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. परिणामी नागरिकांचा वेळ आणि मनस्ताप वाचणार आहे.
बहुतांश नागरिक वाहन खरेदी करताना विविध बँकांकडून कर्ज घेतात. त्या वेळी वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर कर्जाचा बोजाच्या उल्लेख असतो. कर्जाचे हप्ते पूर्ण भरल्यानंतर या नोंदणी प्रमाणपत्रावरील बोजा उतरविणे आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिक ते उतरवत नाहीत. नंतर वाहन विक्री करताना किंवा अनेक वर्षांनी ही बाब लक्षात आल्यावर वाहनधारकाला बँक आणि आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
मात्र, आता फेसलेस प्रणालीमुळे ही प्रक्रिया घरबसल्या होणार आहे. सध्या वाहन प्रणालीवर ४० बँकेच्या सेवा जोडण्यात आल्या आहेत, तर ज्या बँकांची जोडणी झालेली नाही, त्यांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने दिले आहेत.
अशी करा प्रक्रिया
वाहनधारकाला वाहन पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे अर्ज मान्य करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. संबंधित बँक ऑनलाइनच माहिती पडताळून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) अपलोड करेल.
वाहनधारकाला मूळ कागदपत्रे आरटीओमध्ये आणण्याची आवश्यकता नाही. ही सेवा पूर्णतः फेसलेस असून, लोकांना कार्यालयात न जाता घरबसल्या सेवा घेता येईल, असे पुणे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले





